संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : एखाद्या रूग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास कोड ब्ल्यू यंत्रणा असते. ही यंत्रणा प्रामुख्याने खासगी रुग्णालयात असते. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वप्रथम ससून रूग्णालयात कोड ब्ल्यू यंत्रणा सुरू होत आहे. यामुळे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत त्या व्यक्तीला उपचार मिळणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस ही यंत्रणा कार्यान्वित होईल.

ससून रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज सुमारे तीन हजार रुग्ण येतात. त्यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक असतात. याचबरोबर रूग्णालयात दाखल रूग्ण आणि त्यांचेही नातेवाईक असतात. अनेक वेळा रुग्णावर आपत्कालीन प्रसंगी तातडीने उपचार करण्याची परिस्थिती उद्धभवते. याचबरोबर रुग्णाबरोबर आलेल्या व्यक्तीवरही उपचाराची आवश्यकता भासते. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यास पहिले दहा मिनिटे हा सुवर्ण काळ मानला जातो. त्या कालावधीत उपचार झाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. हाच विचार करून ससूनमध्ये कोड ब्ल्यू यंत्रणा सुरू केली जाणार आहे.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडवर आणखी पाणी कपातीची टांगती तलवार, पवना धरणात एवढेच पाणी शिल्लक

याबाबत कोड ब्ल्यू यंत्रणेचे समन्वयक गौरव महापुरे म्हणाले की, अत्यवस्थ रुग्णांसाठी पहिल्या दहा मिनिटांचा कालावधी महत्त्वाचा असतो. त्याचवेळी वैद्यकीय मदत मिळाल्यास आपण त्यांचे प्राण वाचवू शकतो. रुग्णालयात अचानक येणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी ससूनमध्ये कोड ब्ल्यू यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी १० ते १२ जणांचे पथक असून, ते २४ तास उपलब्ध असेल. या पथकात डॉक्टर, भूलरोग तज्ज्ञ, औषधशास्त्र तज्ज्ञ, परिचारिका आणि सेवकांचा समावेश असेल.

हेही वाचा… ‘भारत गौरव यात्रे’त महाराष्ट्र अभावानेच; रेल्वेचे उत्तर, दक्षिण भारतालाच प्राधान्य, राज्यातील मोजक्या स्थळांचा समावेश

अशी असेल यंत्रणा

रुग्णालयात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्याची उद्घोषणा ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे केली जाईल. याचबरोबर रुग्णालयातील कोणत्याही विभागातून सात क्रमांक डायल करून कोड ब्ल्यू पथकाला पाचारण करता येईल. हे पथक १२० सेंकदांच्या आत संबंधित रुग्णाकडे धाव घेऊन त्याच्यावर तातडीचे उपचार करेल.

ससून रुग्णालय हे कोड ब्ल्यू यंत्रणा सुरू करणारे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय आहे. या यंत्रणेसाठी आमचे वेगळे वैद्यकीय पथक असेल. वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी वेळेत उपचार मिळून रुग्णांचे प्राण वाचावेत, यासाठी ही यंत्रणा आहे. – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sassoon hospital has now code blue facility for emergency treatment only in just 120 seconds pune print news stj 05 asj
Show comments