पुणे : मागील वर्षभरात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदी अधिकारी टिकत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता महिनाभराच्या कालावधीत तिसरा वैद्यकीय अधीक्षक नेमण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी अधीक्षक न बदलण्याचे जाहीर केल्यानंतर आठवडाभरात नवीन अधीक्षकांची नियुक्ती झाली आहे. यामुळे ससून रुग्णालयातील अनागोंदी कारभार समोर आला आहे.
मागील काही दिवसांपासून वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भामरे यांच्या जागी नवीन अधीक्षक नेमण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे ते रजेवर गेले होते. आता त्यांच्या जागी शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभरात सहावा आणि महिनाभराच्या कालावधीत तिसरा अधिकारी या पदावर नियुक्त झाला आहे. ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता डॉ. जाधव यांच्या रुपाने तिसरा अधीक्षक नेमण्यात आला आहे.
मागील आठवड्यात डॉ. भामरे आजारी असल्याने रजेवर गेले होते. त्यावेळी त्यांच्या जागी डॉ. जाधव यांची नियुक्ती होण्याची चर्चा सुरू होती. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी याचा इन्कार केला होता. डॉ. भामरे रजेवर गेले असल्याने उपअधीक्षकांकडे कार्यभार देण्यात आला आहे. नवीन अधीक्षक नेमण्याचा प्रस्ताव सध्या तरी नाही, असा दावा डॉ. ठाकूर यांनी केला होता. आता त्यांनीच स्वत:च्या वक्तव्याच्या उलट निर्णय घेत नवीन अधीक्षकांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा : पिंपरी : गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या गणेश मंडळांना सूचना
प्रशासकीय व्यवस्थेचा बोजवारा
ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय आहे. रुग्णालयात दररोज हजारो नागरिक आजारपणासोबत इतर कामांसाठी येतात. आजारपणाव्यतिरिक्त सरकारी प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यात अपंगत्वाची प्रमाणपत्रे, वैद्यकीय प्रतिपूर्ती यासह इतर महत्त्वाची कामे असतात. वर्षभरात आता सहावा अधीक्षक रुग्णालयाने पाहिला आहे. या अदलाबदलीच्या खेळात नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
हेही वाचा : “हिंदूंमध्ये एकता नाही, म्हणूनच…”, सनातन प्रकरणी कालीचरण महाराजांची उदयनिधी यांच्यावर टीका
‘ससून रुग्णालयाचे विद्यमान वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भामरे हे रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जाधव यांनी चांगले काम केल्यास त्यांना पदावर पुढे कायम ठेवण्यात येईल’, असे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी म्हटले आहे. तर ‘ससून रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नेमण्याचा अधिकार अधिष्ठात्यांना आहे. ते त्यांच्या अधिकारात हा निर्णय घेऊ शकतात. यासाठी त्यांना वरिष्ठ पातळीवरून परवानगी घेण्याची आवश्यकता नाही’, असे डॉ. अजय चंदनवाले (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांनी म्हटले आहे.