पुणे : कागदाचा वापर कमी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या व्यवस्थापन परिषद सदस्यांना टॅब्लेट वाटप करण्यात आले आहे. मात्र सदस्यांना टॅब्लेट देऊन कागदांचा वापर खरोखरच कमी होणार का, हा कळीचा प्रश्न आहे. विद्यापीठाच्या मागील व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना पहिल्यांदा टॅब्लेट देण्यात आले होते. व्यवस्थापन परिषदेच्या कामकाजात होणारा कागदांचा वापर कमी करण्यचा उद्देश त्यामागे होता. व्यवस्थापन परिषद सदस्यांना दिलेले टॅब्लेट त्यांचा कार्यकाळ संपल्यावर परत घेण्याबाबतचे धोरण विद्यापीठाने निश्चित केले नसल्याचे त्यावेळी समोर आले होते. या मुद्द्यावरून टॅब्लेट वाटपावर आक्षेप घेण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा व्यवस्थापन परिषद सदस्यांना काही दिवसांपूर्वीच नवेकोरे टॅब्लेट देण्यात आले. एका टॅब्लेटची किंमत सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर म्हणाल्या, की व्यवस्थापन परिषदेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात कागदाचा वापर होतो. आता टॅब्लेटमुळे कागदांचा वापर कमी करून तो बंदच करणे अपेक्षित आहे. टॅब्लेटचा योग्य पद्धतीने वापर केल्यास कागदांवरील खर्चही कमी होऊ शकतो. टॅब्लेट ही विद्यापीठाची मालमत्ता असल्याची जाणीव आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर टॅब्लेट विद्यापीठाला परत केला जाईल किंवा कोणाला टॅब्लेट स्वतःसाठी हवा असल्यास त्याची मूल्यांकनानुसार विद्यापीठाला रक्कम द्यावी लागेल.
हेही वाचा : मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला?…उमेदवारांची चाचपणी सुरू
“या पूर्वीच्या व्यवस्थापन परिषदेच्या कार्यकाळ संपलेल्या सदस्यांनी त्यांना दिलेले टॅब्लेट परत केले किंवा त्याची रक्कम विद्यापीठाकडे भरली. आता कागदविरहित आणि गतिमान कामकाजासाठी नव्या व्यवस्थापन परिषद सदस्यांसाठी विद्यापीठाने टॅब्लेट घेतले असून, कामाच्या गरजेनुसार काही सदस्यांना ते वापरासाठी देण्यात आले. कामकाज संपल्यानंतर किंवा कार्यकाळ संपल्यानंतर संबंधित टॅब्लेट परत देणे आवश्यक आहे. या धोरणामुळे पाच टॅब्लेट खरेदी करण्यात आले आहेत.” – डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ