पुणे : कात्रज परिसरात फाॅरेन सिटी एक्झिबेशनमध्ये वडिलांसोबत गेलेल्या आठ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश राजू पवार (वय ८, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील राजू पांडू पवार (वय ३७) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फाॅरेन सिटी एक्झिबेशनचे संयाेजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत फाॅरेन सिटी एक्झिबेशनचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळणी आहेत. गणेश आणि त्याचे वडील तेथे गेले होते. त्यावेळी गणेशने विद्युत पाळण्यात बसणार होता. तेथे असलेल्या जाळीत वीज प्रवाह उतराला होता. गणेशचा जाळीला स्पर्श झाला आणि विजेच्या झटक्याने तो कोसळला. या घटनेनंतर घबराट उडाली. विद्युत पाळण्याचा वीज प्रवाह त्वरित खंडित करण्यात आला. बेशुुद्धावस्थेतील गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संयोजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत.