पुणे : अवकाशातील ‘आयनोस्फेरिक डिस्टर्बन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयनावरण घटकातील बदल टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) साहाय्याने रेडिओलहरींचा वेध घेताना आयनावरणातील विस्कळीत होणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान सूर्योदयाच्या वेळी आयनावरणातील रेडिओ लहरींचा विस्कळीत होणारा गुणधर्म अनपेक्षितपणे बदलत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) ही माहिती दिली. या संशोधनाचा शोधनिबंध जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. सर्वेश मंगला यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे संशोधन केले. पृथ्वीपासून ८० ते ६०० किलोमीटरदरम्यान आयनावरण आहे. आयनावरणात असलेल्या अणू-रेणूंवर सूर्यकिरणांमधील तीव्र अशा अतिनील आणि क्ष किरणांमुळे परिणाम होतो. या परिणामामुळे ऊर्जाभारित कण म्हणजे आयन तयार होतात. वातावरणातील उंचीमुळे हे आयन दृष्टीस पडत नाहीत. मात्र, त्यांचा दैनंदिन व्यवहारात प्रभाव जाणवतो. विविध उपग्रहांच्या रेडिओ लहरींना आयनांमुळे व्यत्यय येऊन त्यांचे कार्य बिघडू शकते. रेडिओ लहरींच्या माध्यमातून खगोलीय घटकांचा वेध घेताना रेडिओ लहरी या ऊर्जाभारित कणांमुळे विस्कळीत होऊ शकतात. म्हणजे खगोलीय घटकांकडून प्रारणरूपात आलेल्या रेडिओ लहरींचे रेडिओ दूरदर्शकात होणारे संग्रहण व्यवस्थित होत नाही.

हेही वाचा : पुणे महापालिका उभारणार हडपसरमध्ये श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा

या पार्श्वभूमीवर जीएमआरटीच्या साहाय्याने २३५ मेगाहर्टझ आणि ६१० मेगाहर्टझ या वर्णपटातील\B \Bरेडिओ लहरींचा वेध घेऊन विस्कळीत होणाऱ्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान सूर्योदयाच्या वेळी आयनावरणातील रेडिओ लहरींचा विस्कळीत होणारा गुणधर्म अनपेक्षितपणे बदलत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या विशेष निरीक्षणांची जगभरातील भूभौतिकीय अक्षांशांवरून जीपीएस प्रणालीद्वारे होत असलेल्या संबंधित निरीक्षणांशी तुलना करता येईल.

हेही वाचा : काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौर्‍यावर

संशोधनाबाबत एनसीआरएचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता म्हणाले, की या संशोधनातून जीएमआरटीची नवीन कार्यक्षमता दिसली. त्यामुळे खगोलशास्त्र आणि भूविज्ञानातील अंतर कमी होत असून, आयनावरणाच्या अभ्यासाला नवीन दृष्टिकोन मिळाला आहे. आता जीएमआरटीला संशोधनाचे एक नवीन दालन खुले झाले आहे. आयनावरणातील रेडिओ लहरींचा विस्कळीत होण्याचा गुणधर्म म्हणजेच ऊर्जाभारित कणांची घनता अचूकपणे मोजण्यासाठी जीएमआरटीची क्षमता आयनावरणाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. लघु तरंगलांबीच्या रेडिओ लहरींवरील या निरीक्षणांचे तंत्रज्ञान आणि प्रारूप रात्रीसाठी, तसेच उत्तर गोलार्धातील अवकाशीय वेध घेण्यासाठी यशस्वी ठरले आहे. याद्वारे अवकाशीय वातावरणातील न उलगडलेल्या घटना कळू शकतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune scientists successfully observed the changes in ionospheric disturbances with the help of giant metrewave radio telescope pune print news ccp 14 css