पुणे : नांदेड सिटी परिसरात सुरक्षारक्षकांकडून महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. दुचाकीला सोसायटीचे स्टीकर न लावल्याने झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी सुरक्षारक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदेड सिटी टाऊशिपमधील आठ ते दहा सुरक्षा रक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेसह तिच्या मुलाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, पती, दोन मुलांसह गेल्या दहा वर्षांपासून नांदेड सिटीतील मधुवंती सोसायटीत राहायला आहेत. ८ एपिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी महिलेचे पती दुचाकीवरून सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ आले. सोसायटीचे स्टिकर नसल्याने पतीला अडविण्यात आले. त्यानंतर फिर्यादी महिला, मुलासह रहिवासी ओळखपत्र घेऊन प्रवेशद्वाराजवळ आल्या. त्या वेळी पती आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद सुरू होता. त्या वेळी महिला आणि मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी महिलेसह मुलााला बेदम मारहाण केल्याची फिर्याद महिलेने दिली आहे.
दरम्यान, सुरक्षारक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेसह मुलाविरुद्ध शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गु्न्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.