पुणे : गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. बाणेर भागात एमएनजीलकडून गॅस पुरवठा करण्यात येतो. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. गॅस पुरवठा कंपनीतील अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली.
देयक थकीत असल्याने गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. लिंकवर पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडताच ज्येष्ठाच्या बँक खात्यातून चार लाख ४७ हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीसी निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.
नवीन गॅस जोड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची चार लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सायबर चोरट्यांकडून डाॅक्टरची फसवणूक
हैद्राबादला जाण्यासाठी खासगी मोटार देण्याच्या बहाण्याने सायबर चाेरट्यांनी कोंढव्यातील एका डाॅक्टरची ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी फसवणुकीतून मिळालेल्या पैशांमधून महागडा मोबाइल संच खरेदी केल्याचे तपासाता उघडकीस आले आहे. याबाबत एका डाॅक्टरने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डाॅक्टरला हैद्राबादला जायचे होते. त्यांनी एका संकेतस्थळाच्या माध्यमातून हैद्राबादला जाण्यासाटी भाडेतत्त्वावर मोटार घेतली. संबधित संकेतस्थळावर नोंदणी करताना डाॅक्टरने वैयक्तिक माहिती दिली होती. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ८० हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग केले. या पैशांचा वापर करुन चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने महागडा मोबाइल संच खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत.