पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुनील नामदेव गडकर (वय ३२, रा. गणेशयोग सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कसबा पेठेत राहायला आहेत. त्यांचा मुलास वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश हवा होता. वर्षभरापूर्वी त्यांची आरोपी सुनील गडकर याच्याशी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. त्यावेळी गडकरने नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष तक्रारदारांना दाखविले होते.
हेही वाचा : स्वर्गप्राप्तीच्या आमिषाने डॉक्टरची पाच कोटींची फसवणूक
त्यानंतर गडकर याने त्यांना शास्त्री रस्त्यावरील भारती भवन परिसरात बोलावले. त्यांच्याकडून कोरा धनादेश घेतला. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विविध प्रकारची प्रक्रिया पार पाडावी लागते, असे सांगून गडकरने त्यांच्याकडून वेळावेळी ६९ लाख ७० हजार ७४२ रुपये उकळले. त्याने ऑनलाइन तसेच रोखीने पैसे स्विकारले. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्याने तक्रारदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत.