पुणे : मोफत धान्य देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेकडील दागिने आणि रोकड असा ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ७३ वर्षीय ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या हडपसरमधील गांधी चौकातून निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. आम्ही गरजू ज्येष्ठ महिलांना मोफत धान्य वाटप करत आहोत, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. तुम्ही अंगावरील साेन्याचे दागिने काढून ठेवा. दागिने पाहिल्यास आमचे साहेब धान्य देणार नाहीत, अशी बतावणी केली. महिलेला दागिने आणि रोकड एका पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरटे ऐवज ठेवलेली पिशवी चोरुन पसार झाले.
पिशवी चोरुन चोरटे पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी ज्येष्ठ महिलांना अडवून त्यांच्याकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोफत धान्य, साडी वाटपाचे आमिष दाखवून चोरटे महिलांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे.