पुणे : तृतीयपंथीयांच्या समस्या, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तृतीयपंथीय संरक्षण कक्ष (ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन सेल) सुरू करण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील विशेष कक्षांचे कामकाज सुरू राहणार आहे. तृतीयपंथीयांना संरक्षण देणे, तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
समाजकल्याण आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांत तृतीयपंथीय संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात याबाबतचे पत्र पोलीस आयुक्त कार्यालय आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते. पोलीस ठाण्यांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर पोलीस ठाण्यात तृतीयपंथीय संरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले. या कक्षाची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले.
समाजकल्याण विभागाकडे तृतीयपंथीयांकडून तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी कक्ष स्थापन करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाकडून देण्यात आल्या त्यानंतर पोलिसांकडून याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. तृतीयपंथीयांना अनेकदा लिंग आधारित भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर या कक्षाच्या माध्यमातून त्यांना मदत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तृतीयपंथीयांच्या तक्रारींची दखल घेणे, तसेच त्यांना आवश्यक मदत करण्यासाठी पोलीस ठाण्यात संरक्षण कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींचे पोलिसांकडून निवारण करण्यात येणार आहे.
रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस