पुणे : लठ्ठपणा हा इतर व्याधींना निमंत्रण देणारा असतो. त्यामुळे मागील काही वर्षात लठ्ठपणा कमी करण्याच्या ‘बॅरिॲट्रिक’ शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत होत असून, यंदा या १५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता ससूनमध्ये लठ्ठपणावरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला असून अशी सुविधा देणारे ते राज्यातील पहिलेच सरकारी रुग्णालय ठरले आहे. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत चौथ्या मजल्यावर बॅरिॲट्रिक सर्जरी (लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया) वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या वॉर्डची क्षमता १० खाटांची आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नुकतेच वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. ससून रुग्णालय हे बॅरिॲट्रिक सर्जरी वॉर्ड असलेले राज्यातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे. ससूनमध्ये बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया मोफत केली जाते. सुमारे १०० ते १६० किलो वजनाच्या रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रीया होऊन त्यांचे सर्व औषधोपचारही मोफत करण्यात आले आहेत.
हेही वाचा : ज्योतिषाकडून मुहूर्त काढून बारामतीत दरोडा, ज्योतिषासह सहा जण अटकेत
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे बॅरिॲट्रिक सर्जन आहेत. याबद्दल ते म्हणाले की, राज्य सरकारने यावर्षी ४ मार्चपासून लठ्ठपणा जनजागृती व उपचार अभियानाची सुरुवात केलेली आहे. या अभियानाअंतर्गत लठ्ठपणावरील उपचार म्हणून या वॉर्डची सुरुवात करण्यात आली आहे. तरी रुग्णांनी या सुविधेचा फायदा घ्यावा. ससून रुग्णालयात लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया मोफत केली जाते. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली जाते. शस्त्रक्रियेनंतर ३ ते ४ दिवसांत रुग्णांना घरी सोडण्यात येते, असेही डॉ. संजीव ठाकूर यांनी म्हटले आहे.