पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला धरणातील जलशयात आसपासच्या परिसरातील नागरी वस्त्या, गावांमधून सांडपाणी मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. हवेली, वेल्हे तालुक्यातील गावांमधील सांडपाणी खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केलेल्या पाहणीत समोर आले.
दरम्यान, धरणात थेट सांडपाणी जाऊ नये म्हणून जलाशयाच्या दोन्ही बाजूला १२ ते १५ किलोमीटरपर्यंत सांडपाणी वाहिन्या टाकाव्यात. या वाहिन्यांमध्ये येणारे सांडपाणी जमा करून धरणाच्या पुढील बाजूस सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारून या सांडपाण्यावर प्रक्रिया करावी आणि प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडावे, असे जलसंपदा विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा : पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय
खडकवासला धरणाच्या प्रदूषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी गोऱ्हे बुद्रुक, खानापूर, वरदाडे, सोनापूर आणि पानशेत परिसरातील गावांमध्ये सांडपाणी, कचऱ्याच्या समस्येची पाहणी केली. याबाबत संबंधित सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची एकत्रित आढावा बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे, असे चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून राजकारण…’या’ राजकीय नेत्यांचा अडथळा
खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे लोकवस्त्यांमध्ये निर्माण होणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही सुविधा नाही किंवा अपुरी सुविधा आहे. तसेच या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या तरी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हे सांडपाणी थेट धरणाच्या पाण्यात मिसळत आहे. याबाबतच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे धरणात जलप्रदूषण वाढत आहे.
हेही वाचा : पुणे : सिंहगडावर आता ‘सिग्नेचर वाॅक’
याबाबत जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले म्हणाले, ‘खडकवासला परिसराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूंस दहा-बारा किलोमीटर अंतरापर्यंत सांडपाणी वाहिन्यांचे जाळे तयार करावे. त्या सांडपाणी वाहिन्यांच्या माध्यमातून सांडपाणी गोळा करून धरणाच्या पुढील बाजूस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून त्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडणे, अशी योजना आहे. त्यावर महापालिका आणि पीएमआरडीएकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही.’
हेही वाचा : पुणे : पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून; हवामान विभागाचा अंदाज
निधीवरून संभ्रम
धरणाच्या जलाशयाचा मोठा भाग पीएमआरडीच्या हद्दीत येतो, तर काही भाग हा पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पुणेकरांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी या योजना राबविण्यासाठी दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी उपलब्ध करून देण्याबाबतची शिफारस जलसंपदाने केली आहे. मात्र, निधी कोणी उपलब्ध करून द्यायचा याबाबत महापालिका, पीएमआरडीए यांनी पुढाकार घेतलेला नाही. खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढत आहे. त्यामुळे जलप्रदूषणाचे प्रमाणही वाढू लागले आहे.