पुणे : शनिवार पेठेतील मंदार लॉज परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सायंकाळी चोरट्याने बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तर, अन्य एका सदनिकेचा कडी कोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सरस्वती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नोकरी करतात. त्या मंदार लॉजच्या मागील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहतात. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांची सदनिका कुलूप लावून बंद होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने सदनिकेच्या बाहेरील लोंखडी ग्रीलच्या दरवाजाची कडी कोयंडा आणि कुलूप तोडून, आतील लाकडी दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून सहा लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. दरम्यान, चोरट्याने याच अपार्टमेंटमधील अन्य एका बंद सदनिकेच्या दरवाजाचा कडी कोयंडा चोरी करण्याच्या उद्देशाने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.