पुणे : ‘विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगाचा आयाम बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने जग वेढले जात असताना ज्ञानाचे सर्वोच्च अधिष्ठान आपण हरवत चाललो आहोत काय,’ असा प्रश्न विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी सोमवारी उपस्थित केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे झालेल्या अभ्यंकर यांच्या हस्ते जीवसनसाधना गौरव आणि युवा गौरव पुरस्कारांसह विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी अभ्यंकर बोलत होते. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. शिवाजीराव कदम, पुरातत्त्व व मूर्ती स्थापत्यसंशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर, योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता बीडकर, शल्यविशारद डॉ. संजय कुलकर्णी, ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ डॉ. मुकुंद तापकीर, उद्योजक आर. एन. शिंदे यांना जीवनसाधना पुरस्कार, तर अभिनेता शुभंकर एकबोटे, क्रीडापटू स्वप्नील घोसाळे, लेखक सुमितकुमार इंगळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसळकर यांना युवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभ्यंकर म्हणाले, ‘अज्ञानाचे पापुद्रे चित्तावरून कमी करून माणूस घडवणे हाच शिक्षणाचा सर्वोच्च हेतू आहे. या देशातील अनेक प्रज्ञावंतांनी सहस्र वर्षांपासून अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि विस्तार या शिक्षणाच्या मूलभूत स्तंभांना आकार देण्याचे काम केले आहे. विद्यापीठाने माणुसकीचे शिक्षण तळागाळापर्यंत नेऊन ते मुरवले पाहिजे. शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ चांगली नोकरी मिळवून लठ्ठ पगार घ्यावा आणि सुप्रतिष्ठित व्हावे, इतका मर्यादित नाही. ज्ञान आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच शिक्षण पद्धतीने प्रगती करायला हवी.’
‘आधुनिक शिक्षणाचे केंद्र म्हणून विद्यापीठ प्रगती करत आहे. सामाजिक एकता जोपासण्यासोबतच संस्कृती, समाज आणि इतिहास यांच्या विकासातही विद्यापीठ महत्त्वाचे योगदान देत आहे. आगामी काळात समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आधुनिक शिक्षणाच्या सर्वोच्च संधी उपलब्ध करून देण्यातही विद्यापीठ अग्रेसर राहील,’ असे डॉ. गोसावी यांनी नमूद केले. जीवनसाधना गौरव पुरस्कारार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत विद्यापीठाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.