पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह अन्य आरोपींच्या मोबाइल संचांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक तपासात आरोपींनी खुनाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. तांत्रिक विश्लेषणात सहा ध्वनिफिती पोलिसांना मिळाल्या असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.
मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, रामदास मारणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यांना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण केले. आरोपींच्या मोबाइल संचात १९ हजार ८२७ ध्वनिफिती आढळून आल्या. त्यापैकी सहा ध्वनिफिती मोहोळ खून प्रकरणाशी संबधित आहेत. आरोपींना नवीन सीमकार्ड आणि पैसे पुरविणाऱ्या अभिजित मानकराला नुकतीच अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असून, खून प्रकरणात आणखी काहीजण सामील असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकर, सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी केली.
हेही वाचा : वन्यप्राण्यांची नसबंदी नको, शिकारीची परवानगी द्या! पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचा सरकारला सल्ला
बचाव पक्षाकडून ॲड. राहुल देशमुख, ॲड. केतन कदम, ॲड. शरद भोईटे यांनी बाजू मांडली. आरोपींची पोलीस कोठडी वाढविण्यास त्यांनी विरोध केला. पोलिसांनी कोठडी मागण्यासाठी दिलेली कारणे जुनी आहेत. ध्वनिफितीचे विश्लेषण, तसेच आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.