पुणे : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे आज पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी पुणे आणि बारामती या दोन्ही विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संजय राऊत यांनी घेतली. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार सचिन अहिर ,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, वसंत मोरे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी कालावधीमध्ये होणार्‍या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेतली आहे. या बैठकी दरम्यान पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहे. पण यावेळी कोणी म्हणत होतं, आपण स्वबळावर लढलं पाहिजे, तर कोणी म्हणतं महाविकास आघाडीसोबत राहिलं पाहिजे, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मात्र आम्ही आगामी होणार्‍या निवडणुका पूर्णपणे ताकदीने लढणार असल्याचा निर्धार यावेळी केला असून आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीतील प्रमुख नेतेमंडळी एकत्रित बैठक घेऊन कशा प्रकारे निवडणुक लढवली पाहिजे, याबाबत निर्णय घेतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत मोकाटे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर या बैठकीला चंद्रकांत मोकाटे हे देखील आले होते. पण ही बैठक काही मिनिट सुरू होत नाही. तोवर चंद्रकांत मोकाटे बैठकीमधून बाहेर पडले. त्यावेळी चंद्रकांत मोकाटे यांनी उत्तर देणं टाळलं, त्यामुळे शहराच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. चंद्रकांत मोकाटे तातडीने बाहेर का पडले याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की,चंद्रकांत मोकाटे हे पुढील बैठकीला निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader