पुणे : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेकडून (ठाकरे) आंदोलन करण्यात आले. शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली लाल महाल चौक येथे झालेल्या आंदोलनात उपशहरप्रमुख आबा निकम, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उमेश वाघ, किशोर राजपूत, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, युवासेनेचे शहर संघटक राम थरकुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
‘महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य आहे. मात्र, सत्ताधारी शेतकऱ्यांसंदर्भात विधाने करून त्यांची चेष्टा करत आहेत. शेतकरी सक्षमीकरणासाठी सरकार काहीच पावले उचलत नाही. राज्यातील सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे नसून, व्यापारी आणि उद्योगपतींचे आहे,’ असा आरोप या वेळी संजय मोरे यांनी केला. ‘कृषिमंत्री शेतकरी आणि सरकारमधील दुवा असतो. मात्र, कोकाटे त्याला कलंक आहेत,’ असेही मोरे यांनी सांगितले. या वेळी कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.