पुणे : ज्योतिषाकडून ग्रह, नक्षत्रांची स्थिती पाहून, अगदी नेमका मुहूर्त काढून तीन महिन्यांपूर्वी बारामतीत एका व्यावसायिकाच्या घरी तब्बल एक कोटी रुपयांचा दरोडा घालण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून ज्योतिषासह दरोडेखोरांना पकडले. सचिन अशोक जगधने (वय ३०, रा. गुणवडी, बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ, इंदापूर), रवींद्र तानाजी भोसले (वय २७, रा. नीरा वाघज), दुर्योधन ऊर्फ दीपक ऊर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती, फलटण), नितीन अर्जुन मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, माळशिरस) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
दरोडा घालण्यासाठी मुहूर्त काढून देणारा ज्योतिषी रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, रा. आंदरूड, फलटण) यालाही सहआरोपी करून पोलिसांनी गजाआड केले. आरोपी बारामती औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीत कामगार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारामती परिसरातील देवकातेनगरमधील सागर शिवाजीराव गोफणे यांच्या घरावर २१ एप्रिल रोजी दरोडा टाकून दरोडेखोरांनी एका कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. गुन्हा घडला त्या वेळी गोफणे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एक कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.
हेही वाचा : प्रवाशांचा वाचणार वेळ! पुणे विभागात रेल्वेचा वाढणार वेग
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून तपास करण्यात येत होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून आरोपीना अटक केली. या टोळीने ज्योतिषी रामचंद्र चव्हाण याच्याकडून दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढून घेतला होता, अशी माहिती तपासात मिळाली. या टोळीकडून ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या टोळीने आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.