पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोठा मंडप उभारण्यात आला होता. पावसामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र मंडप उभारणीच्या कामामुळे महाविद्यालयाच्या मैदानाची दुर्दशा झाल्याचे स्पष्ट झाले असून, खेळांचा सराव करायचा कसा, असा प्रश्न खेळाडू विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय-स्वारगेट या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी करण्यात येणार होते. मेट्रोच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचे उद्घाटनही याच कार्यक्रमात करण्याचे नियोजन होते. या पार्श्वभूमीवर, स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार होती. त्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाद्वारे राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न होता. मात्र, पावसामुळे हा नियोजित कार्यक्रम होऊ शकला नाही. रविवारी (२९ सप्टेंबर) दूरदृश्य प्रणालीद्वारे मेट्रोच्या उद्घाटनासह अन्य विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला.

हेही वाचा : ‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !

सभेसाठी भव्य मंडप उभारण्याच्या कामामुळे स. प. महाविद्यालयाच्या मैदानाची दुर्दशा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंडप उभारणीसाठीचे साहित्य आणणाऱ्या ट्रकांच्या चाकांनी मैदानावरील माती उखडली गेली आहे. त्याशिवाय पंतप्रधान येणार असल्याने मैदानावर चक्क खडी टाकून मोठा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यामुळे आता ही खडी मैदानावर पसरली आहे. मैदानावर मोठमोठे चर खणण्यात आले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचले आहे.

मैदान खराब झाल्यामुळे फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, ॲथलेटिक्स अशा खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूंची मोठी गैरसोय झाली आहे. विद्यापीठाच्या स्पर्धांसह विविध स्पर्धांसाठीचा सराव करायचा कसा, असा प्रश्न खेळाडूंनी उपस्थित केला आहे.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक परिषद अध्यक्ष ॲड. एस. के. जैन म्हणाले, की सुरक्षिततेच्या कारणास्तव सभेसाठी मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. तसेच मैदान पूर्ववत करून देण्याच्या बोलीवरच महामेट्रोला मैदान देण्यात आले. त्यानुसार महामेट्रोने मैदान पूर्ववत करून देणे आवश्यक आहे. संस्थेच्या माध्यमातून मैदान सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया या पूर्वीच सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा : मावळमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध छुपा प्रचार? आमदार सुनील शेळके यांच्यासाठी गोळीबाराचा मुद्दा अडचणीचा

मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी स. प. महाविद्यालयाचे मैदान घेतानाच ते पूर्वस्थितीत करून देण्याचे ठरले होते. त्यानुसार महामेट्रोकडून मैदान पूर्ववत करून देण्यात येणार आहे, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sp college ground affected due to pm narendra modi rally which cancelled pune print news ccp 14 css