पुणे : स्वारगेट बस स्थानकात बलात्कार प्रकरणानंतर सुरक्षाव्यवस्थेतील अभाव समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) महामार्गांवरील संवेदनशील बस थांब्यांवर पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एसटी’ महामंडळाच्या ४२ बस स्थानकांच्या हद्दीतील १०० पेक्षा अधिक बस थांबे आहेत. यापैकी काही थांबे महामार्गालगत असून संवेदनशील बस थांबे निश्चित करून त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बस स्थानकांच्या हद्दीत एसटी’ महामंडळाचे महामार्गांलगत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बस थांबे आणि निवारे उभारण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरीकांना सुलभ प्रवास करण्यासाठी १०० पेक्षा अधिक थांब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगारातील बस स्थानकातून बस बाहेर पडल्यानंतर इतर स्थानकांव्यतिरिक्त केवळ या बस थांब्यांवर बस उभ्या केल्या जातात. ग्रामीण भागातून शहरात किंवा नगराच्या ठिकाणी व्यवसाय, नोकरी किंवा शिक्षणानिमित्त शेकडो प्रवासी दैनंदीन ये-जा करत असतात. महामार्गांवरील थांब्यांवर दैनंदीन प्रवाशांचीच संख्या कायम असून या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.
विशेषत: चांदणी चौक, कात्रज, रावेत, चांदणी चौकातील बाह्यवळण ओलांडल्यानंतर महामार्गावरील हिंजवडी फाटयाजवळ मुंबईच्या दिशेने जाणारे आयटी कंपन्यातील प्रवासी कायम असतात. प्रवासी रात्री अपरात्री बस स्थानकापर्यंत जाण्याऐवजी महामार्गावरील बस थांब्यावर उभारून बस थाबवूनच प्रवास करतात. त्यामुळे या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘एसटी’ महामंडळाने निर्णय घेतला असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
प्रवासी आणि काळवेळ निश्चित करणार शहरातील महामार्गांवर वर्दळ असली, तरी ग्रामीण भागातील बस थांबे हे निर्जनस्थळी असल्याने या बस थांब्यांवर शुकशुकाट असतो. दैनंदीन प्रवास करणारे प्रवासी असल्याने अचानक बसला विलंब किंवा अडथळे येण्याची शक्यता असल्याने बसची प्रतीक्षा करत थांबावे लागते. अशा बस थांब्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार बसचा मार्ग आणि काळवेळ निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार पोलिसांकडून मदत घेण्यात येणार आहे.
पुणे शहरासह ग्रामीण भागातील महामार्गांवर १०० पेक्षा अधिक बस थांबे आणि निवारे उभारण्यात आले आहेत. या थांब्यांवरून दैनंदीन प्रवासी करणाऱ्यांची संख्या जास्त असून रात्री, अपरात्री देखील प्रवास केला जातो. महिला सुरक्षिततेसाठी सुरक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. लवकरच संवेदनशील आणि वर्दळीच्या बस थांबे निश्चित करून अशा थांब्यांची माहिती पोलिसांना पाठवून गस्त विढविण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार आहे.
प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे.