पुणे : एक ज्येष्ठ नागरिक गेल्या काही वर्षांपासून लघवीसंबंधी गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याने विविध ठिकाणी उपचार घेऊनही त्रास कमी होत नव्हता. अखेर त्याला मूत्राशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्याच्यावर रोबोटिक शस्त्रक्रिया करून त्याला बरे करण्यात यश मिळविले आहे.
पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मूत्राशयाच्या कर्करोगासाठी ही रोबोटिक शस्त्रक्रिया केली. हा ७० वर्षीय पुरुष रुग्ण पुण्यातील रहिवासी असून तो लघवीसंबंधी गंभीर आजाराने त्रस्त होता. लघवी करताना त्रास होणे, जळजळ होणे आणि लघवीमधून रक्तस्त्रावाची समस्या त्याला होती. त्याला अखेर डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या मूत्राशयात गाठ असल्याचे तपासणीत आढळून आले. तसेच, ही गाठ घातक स्वरूपाची असल्याचे निष्पन्न आले. रुग्णाच्या शरीरात इतर भागामध्ये कर्करोगाची वाढ रोखण्यासाठी डॉक्टरांनी त्वरित उपचार करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : पुणे: बिबवेवाडीत झाडाची फांदी पडून तरुणाचा मृत्यू
गाठीचे वाढते गंभीर स्वरूप आणि रुग्णाचा धूम्रपानाचा इतिहास लक्षात घेऊन डॉक्टरांनी मूत्राशय काढून टाकण्याची शिफारस केली. रुग्णाने या प्रक्रियेस संमती दिली. त्यामुळे मूत्राशय काढून टाकण्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टर हिमेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. पुण्यात पहिल्यांदाच अशा शस्त्रक्रियेत रोबोटिक स्टेपलरचा वापर करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि पाच दिवसांनंतर त्याला घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर केलेल्या मूल्यांकनांमध्ये कर्करोगाची पुनरावृत्ती आढळून आली नाही. यामुळे रुग्ण ९९ टक्के बरा झाल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा : पुणे: पावसामुळे आवक कमी; पालेभाज्यांचे महिनाभर दर तेजीत
रुग्णावर यशस्वीपणे रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणार नाही याची खात्री करून घेण्यात आली. रुग्णाची प्रकृती आता सुधारली आहे.
डॉ. हिमेश गांधी, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी