पुणे : पोटात आणि छातीत तीव्र वेदना असल्याने एका व्यक्तीला अन्न गिळता येत नव्हते. त्यामुळे तो सहा महिन्यांहून अधिक काळ द्रवपदार्थ घेत होता. अखेर त्याला हर्नियामुळे गंभीर गुंतागुंत झाल्याचे तपासणीत समोर आले. या रुग्णावर डॉक्टरांनी फंडोप्लिकेशन प्रक्रियेद्वारे यशस्वीपणे उपचार केले आहेत.
हा रुग्ण ५७ वर्षांचा असून, त्याच्या पोटात व छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्याला अन्न गिळता येत नव्हते, कारण अन्न घशाखाली जात नव्हते. त्यामुळे तो सहा महिन्यांहून अधिक काळ द्रवपदार्थ घेत होता. त्यामुळे त्याच्या रक्तातील प्रथिनांची पातळी कमी झाली होती व तीव्र रक्तक्षय झाला होता. त्याची हिमोग्लोबीनची पातळी ७ ग्रॅमपर्यंत खाली आली होती. तो केवळ द्रवपदार्थांवर असल्याने वजन कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती. त्याच्या तपासणीत हायटस हर्नियाचे निदान झाले. जेव्हा कुठलाही अवयव किंवा पेशी कमकुवत आवरणाच्या बाहेर येतात तेव्हा त्याला हर्निया म्हणतात. हायटस हर्नियामध्ये पोटाचा वरचा भाग श्वास पटलातून छातीच्या पोकळीत वर ढकलला जातो. त्यामुळे रुग्णाला पोटात आणि छातीत तीव्र वेदना होत होत्या.
हेही वाचा : पुणे: सीमा शुल्क विभागाकडून ७८ लाखांचे सोने ताब्यात
याबाबत शल्यचिकित्सक डॉ. संजय शिवदे म्हणाले की, हायटस हर्नियाव्यतिरिक्त त्यांची परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची होती. कारण हिपॅटायटिस सी संसर्ग असल्याचे निदान झाले होते. हिपॅटायटिस सी मुळे त्यांच्या यकृताला सूज आली होती. याशिवाय रुग्णावर याआधी देखील हर्नियाकरिता लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रुग्णाला तंबाखू सेवनाची सवय होती आणि जबड्यात कडकपणा असल्याने तोंड नीट उघडता येत नव्हते. शस्त्रक्रियेदरम्यान कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी हे एक मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत भूल देणे अतिशय जोखीमकारक होते. ही सर्व आव्हाने पेलून आम्ही खुल्या शस्त्रक्रियेद्वारे फंडोप्लिकेशन प्रक्रिया केली.
हेही वाचा : पार्टीसाठी चाललेल्या तरुणांच्या मोटारीची दुचाकीला धडक; मजुराचा मृत्यू, कल्याणीनगरनंतर शिरुरमध्ये अपघात
या रुग्णाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही प्रक्रिया मोफत करण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकात समर्थ युनिव्हर्सल हॉस्पिटलचे डॉ. संजय शिवदे, डॉ. विद्याधर शिवदे, डॉ. अनंत बागुल, भूलतज्ज्ञ डॉ. प्रसाद आंबेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा वाकडे, डॉ. स्मिता भोयर यांचा समावेश होता.
फंडोप्लिकेशन म्हणजे काय?
फंडोप्लिकेशन ही शस्त्रक्रिया ॲसिड रिफ्लक्स व हायटस हर्नियासाठी केली जाते. या प्रक्रियेमध्ये शल्यचिकित्सक श्वासपटलातून अन्ननलिका जिथून जाते ती जागा घट्ट करतात. पोटाचा वरचा भाग ज्याला फंडस म्हणतात, त्याला अन्ननलिकेच्या खालच्या भागाभोवती शिवले जाते.