पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला असून यंदा प्रथमच अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हे मतदारसंघात आमने सामने आले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून लढणार आहेत. यामुळे राज्यातील जनतेचं या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व घडामोडी दरम्यान आज पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ,शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या तीन ही पुणे जिल्हय़ातील महायुतीचे उमेदवारानी मार्केटयार्ड येथे फळभाज्या विक्री करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच यावेळी सुनेत्रा पवार यांच्या गाण्याचे लाँचिग झाले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्याशी संवाद देखील साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व

मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकाराशी संवाद साधताना मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असे विधान करीत सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्या विधानावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. शरद पवार यांच्या विधानाबाबत सुनेत्रा पवार यांना विचारले असता, त्यांनी हात जोडत उत्तर देणे टाळले. मात्र त्यांनी अन्य विषयावर भूमिका देखील मांडली. आजपर्यंत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला. आता स्वतः साठी प्रचार करित आहात त्या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ज्यावेळी स्वतः साठी प्रचार करावा लागतो. त्यावेळी जबाबदारीची भावना असते. प्रत्येक मतदाराकडे जाऊन आपल्याला मतदान करावे असे आवाहन करून, त्यांच्यामध्ये एक प्रकारे विश्वास निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की,नटसम्राट खासदार पाहिजे : अजित पवार

विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची मतदारसंघात कोणती कामे राहिली आहेत. तुम्ही निवडून आल्यावर कोणत्या कामांना प्राधान्य देणार त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जी विकास काम आवश्यक आहेत. ती येत्या काळात निश्चित केली जातील, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, पुणे शहर आणि जिल्ह्याच्या आसपासच्या भागातील शेतकरी मार्केटयार्ड येथील बाजारपेठेत माल विकण्यास दररोज येत असतो. त्या पार्श्वभूमीवर आज मार्केटमध्ये येऊन शेतकरी वर्गाशी संवाद साधत आहे. येत्या काळात शेतकरी वर्गासाठी विविध सोयीसुविधा निश्चित आणल्या जातील असे देखील त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sunetra pawar on sharad pawar s statement about supriya sule and original pawar svk 88 css