पुणे : बाणेर भागातील एका नामांकित रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर पर्यवेक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पर्यवेक्षकाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी महिलेने सुरुवातीला रुग्णालयातील सुरक्षा अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती. मात्र, त्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. अखेर महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
याप्रकरणी सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिला रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे. आरोपी बेनगुडे रुग्णलयातील सफाई विभागात पर्यवेक्षक आहे. तक्रारदार महिला एका खासगी संस्थेकडून रुग्णलायात सफाई कर्मचारी म्हणून काम करते. गेल्या चार वर्षांपासून ती रुग्णालयात काम करत आहे. २९ जून रोजी महिला कामावर आली. दुपारी काम आटोपल्यानंतर महिला तिसऱ्या मजल्यावर आली. तेव्हा बेनगुडे महिलेला भेटला. क्ष किरण विभागात धूळ आहे. ती साफ करायची आहे, असे सांगून त्याने महिलेला त्या विभागात नेले. सायंकाळी सहाच्या सुमारास महिला सफाई काम करत होती. त्यावेळी बेनगुडेने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास कामावरुन काढून टाकेल, अशी धमकी त्याने तिला दिली.
हे ही वाचा… बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल क्रमांकाची तपासणी २०० हून जास्त सराइतांची चौकशी
त्यानंतर महिला घरी गेली. घाबरलेल्या महिलेने याप्रकाराची वाच्यता केली नाही. रुग्णलायातील सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याला याबाबत तक्रार अर्ज दिला. मात्र, तक्रार अर्जाची दखल न घेण्यात आल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी बेनगुडेला अटक केली.