पुणे: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला, त्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या एनकाउंटरवरुन राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी अनेक मुद्दे उपस्थित करत महायुती सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु, पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे. या प्रकरणात अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि पोलिसांकडून केल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत, आज देखील तीच आमची भूमिका आहे. पण आरोपी अक्षय शिंदे याला काल तळोजामधून बदलापूरमध्ये जायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेण्यात आली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केली गेली ? तसेच ज्या पिस्तूलने आरोपी अक्षयवर गोळी झाडली गेली, ती पिस्तूल अनलोडेड असताना ते पिस्तूल अक्षय शिंदे याला कसे काढता आले ? त्याच्या दोन्ही हातात बेड्या होत्या आणि पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल त्यांने कसं काढलं ? यासह अनेक प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा : कृषी पदवीच्या २७ टक्के जागा रिक्त; नोकरीच्या संधी, पदभरती घटल्याने विद्यार्थ्यांची पाठ

त्या पुढे म्हणाल्या की, या एन्काउंटर प्रकरणातील पोलिस अधिकारी संजय शिंदे यांची आजअखेर वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात संजय शिंदे यांचा हाथ होता. त्यामुळे संजय शिंदे यांना काही कालावधी करिता निलंबित देखील करण्यात आले होते. त्यामुळे अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नसून कोणाला वाचवले गेले आहे ? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि या फेक एन्काउंटर प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत, ३००२ किंवा ३०१४ मधील तारीख दिली तरी आम्ही न्याय मागत राहणार आहोत, ही संपूर्ण घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे का? असा सवाल उपस्थित करीत महायुती सरकारवर त्यांनी टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sushma andhare told that will go to court in akshay shinde fake encounter case svk 88 css