पुणे : ‘रवींद्रनाथ टागोर, साहित्य, मानवी जीवन या तीन घटकांचा प्रभाव आणि त्याही पलीकडे जात तपन सिन्हा यांच्या चित्रपटांतून मानवता साकारली गेली. मनोरंजनासोबतच सामाजिक विषय आणि त्यातले बारकावे त्यांनी आपल्या चित्रपटांतून दाखवले. त्यांनी निवडलेले चित्रपट हे त्यांच्या काळाच्या पुढचे आहेत. तपन सिन्हा हे काळाच्या पुढे पाहणारे दिग्दर्शक होते,’ असे मत बंगालमधील ज्येष्ठ समीक्षक स्वपन मलिक यांनी व्यक्त केले.

‘तपन सिन्हा आणि त्यांचे चित्रपट’ या विषयावर २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीफ) सोमवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ दिग्दर्शक गौतम घोष आणि स्वपन मलिक या चर्चासत्रात सहभागी झाले होते. या वेळी महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक सैबल चॅटर्जी उपस्थित होते.

मलिक म्हणाले, ‘तपन सिन्हा यांच्या चित्रपटांवरून अनेकांनी विविध भाषांमध्ये चित्रपट बनवले. सामान्य माणसांचे विषय घेऊन मनोरंजन करणारे चित्रपट त्यांनी तयार केले. त्यांच्या चित्रपटांमध्ये मानवता हे मध्यवर्ती वैशिष्ट्य दिसून येते. तपन सिन्हा यांनी प्रामाणिकपणे मनोरंजन करणारे चित्रपट बनवले असले, तरी त्याला सामाजिक संदर्भ होते. तपन सिन्हा हे निरीक्षणावरून चित्रपटांच्या पटकथा लिहायचे. त्यांनी आर्ट आणि कॉमर्स यांची सीमारेषा धूसर करणारे चित्रपट तयार केले. या चित्रपटांना रसिकांनी डोक्यावर घेतले होते.

तपन सिन्हांच्या आठवणींना उजाळा देताना मलिक यांनी सिन्हा यांचा ‘काबुलीवाला’ हा चित्रपट पुण्यातही सलग सहा आठवडे चालला होता, हे अधोरेखित केले. घोष म्हणाले, ‘सिन्हा यांनी सगळ्या प्रकारचे चित्रपट तयार केले. त्यांनी आपले विषय बदलत ठेवले. त्यांनी उत्तम सिनेमे तयार केले असा दावा कधीही केला नाही. त्यांनी आवडीचे विषय घेऊन चित्रपट केले, ते यशस्वीही झाले. सिन्हा यांचे चित्रपट पुनर्संचयित करणे गरजेचे आहे.’

Story img Loader