पुणे : स्वारगेट-कात्रज या नियोजित भूमिगत मेट्रो मार्गिका प्रकल्पातील बालाजीनगर आणि बिबवेवाडी या स्थानकांसाठी लागणारा ६८३ कोटी रुपयांचा वाढीव खर्च राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने (महामेट्रो) स्थानकांसाठी नव्याने निविदा काढली असून, स्वारगेट-कात्रज प्रकल्पाला येत्या तीन महिन्यांत सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महामेट्रोकडून स्वारगेट ते कात्रज हा ५.४६ किलोमीटर अंतरावरील भुयारी मार्गिका प्रकल्प हाती घेतला आहे. मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन मेट्रो स्थानके प्रस्तावित करण्यात आले असताना नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव बालाजीनगर (भारती विद्यापीठ) आणि सहकारनगर या दोन स्थानकांसाठी मागणी करण्यात आली. महामेट्रोकडून तपासणी केल्यानंतर दोन स्थानके वाढविण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करून संबंधित अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता.

दरम्यान, महानगरपालिकेने अहवालाला मंजुरी दिली. मात्र, दोन स्थानकांमुळे वाढणारा ६८३ कोटी रुपयांचा खर्च उचलणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित असताना राज्य सरकारकडून संबंधित दोन्ही स्थानकांना मंजुरी देऊन वाढीव खर्चासाठी निधी देण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महामेट्रोकडून निविदा

महामेट्रोकडून नियोजित स्वारगेट – कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन स्थानकांचा समावेश नव्हता. यामुळे या परिसरातील नागरिकांनी विराेध केल्यावर पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा दोन स्थानके वाढविण्याची सूचना केली. त्यामुळे महामेट्रोकडून पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदेला ४० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या काळात आलेल्या निविदांची छाननी केल्यानंतर काम सुरू होणार असून, याला तीन-चार महिने लागणार आहेत.

स्वारगेट-कात्रज भुयारी मार्गिका प्रकल्पातील वाढीव दोन स्थानकांमुळे वाढीव खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे आता पाच स्थानके होणार असल्याने नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील दोन – तीन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होईल.- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

स्वारगेट-कात्रज मार्गिका दृष्टिक्षेप

एकूण अंतर : ५.४६ किमी
एकूण खर्च : ३,६४७ कोटी रुपये
वाढीव खर्च : ६८३
कामाचा कालावधी : ४ वर्षे
एकूण स्थानके : ५