पुणे : वारस नोंद करण्यासाठी एकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बाणेरमधील तलाठ्यासह मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. एसीबीच्या पथकाने तलाठ्याच्या मोटारीची तपासणी केली. तेव्हा मोटारीत तीन लाख रुपयांची रोकड आढळून आली. याप्रकरणी तलाठ्यासह मध्यस्थाविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या वडिलांची बाणेरमध्ये जमीन आहे. वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रात संबंधित जमीन तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे केली होती. २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वारस नोंद करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह बाणेर येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता.

हेही वाचा >>> एकतर्फी प्रेमातून युवतीचे अपहरण, नवी मुंबईतून युवतीची सुटका

त्यानंतर तक्रारदार १८ डिसेंबर रोजी बाणेर येथील तलाठी कार्यालयात गेले. त्यांनी तलाठ्याची भेट घेतली. तक्रारदाराच्या पत्नीचे वारस म्हणून नाव नोंदविण्यासाठी तलाठ्याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी पैसे कमी करण्यास सांगितले. तडजोडीत त्यांनी तलाठ्याला दहा हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने बाणेर येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला. तक्रारदाराकडून अन्य एकाने तलाठ्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारली. एसीबीच्या पथकाने त्याला पकडले. चौकशीत त्याने तलाठ्यासाठी लाच स्वीकारल्याची कबुली दिली. पथकाने तलाठ्याच्या मोटारीची तपासणी केली. तेव्हा मोटारीत तीन लाख रुपयांची रोकड सापडली. एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune talathi detained for bribe of ten thousand to register the heir in baner pune print news rbk 25 css