पुणे : एनडीए रस्त्यावरील शिवणे औद्योगिक वसाहतीत एका मालवाहून टेम्पोचालकाला किरकोळ अपघात घडल्यानंतर मारहाण करून वाहनाची चावी काढून घेण्यात आली आणि नुकसानभरपाईपोटी संबंधिताने दहा हजारांची मागणी केली. या प्रकरणी टेम्पोचालकाला धमकावून चावी काढून घेणे, तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत तुषार दत्तात्रय भाटे (वय ३२, रा. केंजळे, ता. भोर, जि. पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटे हे संतोष मालुसरे यांच्या मालवाहू टेम्पोवर चालक म्हणून काम करतात. टेम्पोत माल भरल्यानंतर भाटे एनडीए रस्त्यावरील शिवणे औद्योगिक वसाहतीत आले. त्या वेळी रस्ता चुकल्याने भाटे टेम्पो मागे घेत होते. तेव्हा पाठीमागे असलेल्या एका मालवाहू पिकअप वाहनाला टेम्पोची धडक लागली. त्यात पिक-अपचा दर्शनी भागाचा बंपर तुटला. त्या वेळी तेथे असलेल्या एकाने भाटे यांना मारहाण केली. टेम्पोची चावी काढून घेतली आणि दुकानमालकाकडे दिली. भाटे यांनी दुकानमालकाला चावी मागितली, तेव्हा दुकानमालकाने चावी काढून घेणारा दुकानातील व्यवस्थापक असून, दहा हजार रुपये नुकसानभरपाई दिल्यानंतर चावी मिळेल, असे त्यांना सांगितले.

दुकानमालक आणि व्यवस्थापकाने भाटे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर भाटे यांनी टेम्पोमालक मालुसरे यांना घटनेची माहिती मालुसरे यांनी दुकानमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकान मालकाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. या घटनेनंतर मालुसरे आणि त्यांच्या टेम्पोवरील चालक भाटे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा नवनाथ चव्हाण नामक व्यक्तीने पैसे नाही दिले तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. भाटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी दुकानमालक, व्यवस्थापक यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

कायदा हातात घेतल्यास कारवाई

अपघात जाणीवपूर्वक होत नाही. अपघातानंतर वाहनचालकांना धमकावून चावी काढून घेणे, तसेच पैसे मागण्याचे प्रकार घडतात. वाहनचालकाला मारहाण केली होती. कायदा हातात घेणे चुकीचे आहे. कायदा हातात घेणे हा गंभीर गुन्हा आहे. किरकोळ अपघात घडल्यानंतर पोलीस कारवाई करतील. मात्र, मारहाण करून परस्पर पैसे घेणे चुकीचे आहे, असे आवाहन वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी केले आहे.