पुणे : दहीहंडीनिमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीच्या मार्गात गुरुवारी (७ सप्टेंबर) तात्पुरता बदल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे. शनिवारवाडा ते सिंहगड (बस मार्ग ५०) आणि अप्पा बळवंत चौक ते सांगवी (मार्ग क्रमांक ११३) या मार्गावरील गाड्या रस्ता बंद झाल्यानंतर अनुक्रमे स्वारगेट आणि महापालिका भवन येथून संचलनात राहणार आहेत. मार्ग क्रमांक ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गावरील गाड्या जाता-येता डेक्कन जिमखाना, महापालिका भवन, गाडीतळ (जुना बाजार) येथून सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा : पिंपरीत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गणेशमूर्ती संकलन केंद्र
रातराणी-१ आणि मेट्रो शटल सेवा रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रस्ता, डेक्कन, टिळक रस्ता मार्गे संचलनात राहणार असून, स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रस्त्याने धावणार आहेत. स्वारगेट आगारातून सुटणाऱ्या मार्ग क्रमांक ३ आणि ६ हे मार्ग गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.