पुणे: यंदा जानेवारी ते जून या सहामाहीत पुण्यातील घरांच्या विक्रीत किंचित घट नोंदवण्यात आली. याचवेळी परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत मोठी घट झाली असून, मध्यम व मोठ्या आकाराच्या घरांना मागणी वाढली आहे. पहिल्या सहामाहीत पुण्यात एकूण २१ हजार ६७० घरांची विक्री झाली असून, किमतीत सरासरी ३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
नाइट फ्रँक इंडियाने पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पहिल्या सहामाहीत पुण्यातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत ०.६ टक्के घट झाली आहे. घर खरेदी करणाऱ्यांमध्ये स्थलांतरित नोकरदारांचे प्रमाण अधिक आहे. एकूण विक्रीत परवडणाऱ्या म्हणजेच ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचे प्रमाण ४२ टक्क्यांवर आले आहे.
हेही वाचा… पुणे शहर ‘राष्ट्रवादी’चा शरद पवारांना पाठिंबा
मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ते ५० टक्के होते. याचबरोबर ५० लाख ते एक कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण एकूण विक्रीत वाढून ४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ते ४१ टक्के होते. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या संख्येतही वाढ होऊन एकूण विक्रीत त्यांचे प्रमाण १२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
हेही वाचा… राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी संभ्रमात… कुठे जायचे तेच कळेना?
पहिल्या सहामाहीत पुण्यातील नवीन गृहप्रकल्पांच्या संख्येत २२ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीतील नवीन गृहप्रकल्पांतील घरांची संख्या २१ हजार २३४ आहे. देशात नवीन गृहप्रकल्पांच्या संख्येत दोन आकडी वाढ गाठण्याची कामगिरी करणारे पुणे हे देशातील एकमेव महानगर आहे. याच वेळी पुण्यात घरांच्या किमतीत सरासरी ३ टक्के वाढ झाली आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंजवडी, बाणेरमध्ये घरांची मागणी वाढणार
पुणे हे माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाचे केंद्र आहे. याचबरोबर सरकारकडून अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प शहरात उभारले जात आहेत. त्यामुळे पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्राला गती मिळत आहे. करोना काळात आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले होते. आता कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले जात आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांच्या परिसरात हिंजवडी आणि बाणेरमध्ये आगामी काळात घरांना मागणी वाढेल, असा अंदाजही अहवालात वर्तविण्यात आला आहे.