पुणे : हडपसर पोलीस ठाण्यातील कोठडीतून (लाॅकअप) चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. गोविंद उर्फ पिंट्या घोडके असे पसार झालेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात घोडकेला अटक करण्यात आली होती. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घोडकेला पोलीस ठाण्यातील कोठडीतून बाहेर काढण्यात आले. त्याच्या हाताचे ठसे घेण्याचे काम करण्यात येणार होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून घोडके पसार झाला.
हेही वाचा : खबरदार, रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावली तर… ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. पवार यांची डॉक्टरांना तंबी
घोडके पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसर गजबजलेला आहे. या भागातील गाडीतळ परिसरातून तो पसार झाल्याचा संशय आहे. पसार झालेल्या घोडकेचा शोध घेण्यासाठी त्वरित नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, घोडकेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.