पुणे : गणेशोत्सवात मोबाइल चोरी करण्यासाठी उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमधून आलेल्या चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून महागडे २० मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे. चोरट्यांनी शहराच्या मध्यभागातून मोबाइल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. कौशल मुन्ना रावत (वय २१, रा. लखनौ, उत्तरप्रदेश), संतोषसिंग श्रवण सिंह (वय २२, रा. झारखंड), जोगेश्वर कुमार रतन महातो (वय ३०, रा. झारखंड), सूरज रामलाल महातो (वय ३०, रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. शहराच्या मध्यभागासह उपनगरातील मंडळाचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच चोरीला जातात. हडपसर पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून नागरिकांकडील मोबाइल चोरणारे हडपसरमधील गांधी चौकात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी अजित मदने, प्रशांत टोणपे यांना मिळाली. त्यानंतर सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्या पथकाने चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपयांचे २० मोबाइल संच जप्त करण्यात आले.
हेही वाचा : पुणे : रोहित पवारांचे पुणे-मुंबई महामार्गावर भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले…
आरोपी एकत्रीतपणे लखनौ रेल्वे स्थानकावर भेटले. त्यानंतर ते पुण्यात आले. फरासखाना, स्वारगेट, बंडगार्डन, हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांनी मोबाइल चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.