पुणे : दहावीतील विद्यार्थ्यांनी वर्गातील मुलींचे अॅपच्या मदतीने अश्लील छायाचित्रे तयार करून समाजमाध्यमात प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अल्पवयीनांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारपासून प्रतिबंधक कायदा (पोक्सो), तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अल्पवयीन एका शाळेत दहावीत शिकत आहेत. पीडित मुली त्यांच्याच वर्गातील आहेत. एका मुलाने बोल्ट नावाच्या अॅपचा वापर करून वर्गातील तीन मुलींच्या छायाचित्रात फेरफार केला. फेरफार केलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आली. याबाबतची माहिती शाळेतील शिक्षिकेला मिळाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. हडपसर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.