पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. पुणे-सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तसेच बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद पुतळा परिसरात रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याच परिसरात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.
पुणे-सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा सिटी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. सतीश वामनराव जगताप (वय ६१) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक केतकी चव्हाण तपास करत आहेत.
बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ रिक्षाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. रविंद्रकुमार सिन्हा (वय ६३, रा. बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सिन्हा यांचा मुलगा अविनाशकुमार (वय ३५) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविंद्रकुमार बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद पुतळा परिसरातून ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी रिक्षाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रविंदक्रमार गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णलायात मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी शाम लोहोमकर तपास करत आहेत.
हेही वाचा : राज्यात १८, १९ नोव्हेंबरला शाळांना सुटी नाही… काय आहे शिक्षण आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण?
बिबवेवाडी परिसरात १२ ऑक्टोबर रोजी भरधाव दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय बाबू किरवले (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.