पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन वर्षांच्या बालकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मांजरी, सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी, तसेच नगर रस्ता परिसरात अपघातच्या घटना घडल्या. हडपसर भागातील मांजरी भागात घरासमोर खेळणारा तीन वर्षांचा मुलगा मोटारीच्या चाकाखाली सापडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. विष्णू अमरीश जाधव (वय ३) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अमरीश हनुमंता जाधव (वय २२, रा. विक्रम वाइन्सशेजारील गल्ली, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालक पिंटू भवरलाल माली (वय ३३, रा. घुलेनगर, मांजरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचा तीन वर्षांचा मुलगा विष्णू २८ मार्च रोजी दुपारी घरासमोर खेळत होता. त्या वेळी मोटारीच्या धडकेत विष्णू गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या विष्णूचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. देवानंद सुरेश मरगुत्ती (वय २६, रा. गणपतीनगर, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक संदीप सूर्यभान धनवटे (वय ३३, रा. यशोदिप बिल्डिंग, किरकवाडी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत देवानंद यांचा भाऊ सचिन सुरेश मरगत्ती यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२८ मार्च रोजी किरकटवाडी परिसरातील स्वागत हाॅटेलसमोर डंपरचालक धनवटेने डंपर लावला होता. डंपरपासून काही अंतरावर देवानंद झोपला होता. रात्री दहाच्या सुमारास धनवटेने डंपर सुरू केला. डंपरजवळ झाेपलेल्या देवानंद चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.

नगर रस्त्यावरील येरवडा परिसरात रस्ता ओलांडणारी ज्येष्ठ महिला वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. २१ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. अमीना करीम मेघानी (वय ६०, रा. विलमिन सोसायटी, आगाखान पॅलेससमोर,शास्त्रीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मेघानी यांची मुलगी अमरीन (वय २८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी अमीना रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनगर परिसरातून निघाल्या होत्या. नगर रस्त्यावरील श्री हाॅस्पिटलसमोरुन त्या रस्ता ओलांडत हाेत्या. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे तपास करत आहेत.