पुणे : पुणे-मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समितींच्या आवारात टोमॅटोंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार चार ते पाच रुपये किलो, तर किरकोळ बाजार एक किलोला १५ ते २० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर शंभर रुपयांपर्यंत गेले होते. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली होती. टोमॅटोला भाव मिळाल्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूरसह राज्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. लागवड चांगली झाल्याने गेल्या महिन्याभरापासून राज्यातील सर्व बाजार समितींच्या आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविला. टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घट झाली.

हेही वाचा : “असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

पुणे, मुंबईतील बाजारात पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर परिसरातून टोमॅटो मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविले जातात. पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज आठ ते नऊ हजार पेटी टोमॅटोची आवक होत आहे. टोमॅटोची आवक दुप्पट झाली आहे. बाजारपेठेत टोमॅटोची बेसुमार आवक होत असल्याने भावात मोठी घट झाली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात टोमॅटोला भाव मिळाले होते. चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. सद्य:स्थितीत बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परराज्यातून असणारी मागणीही कमी झाली आहे. टोमॅटोला भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. घाऊक बाजारात टाेमॅटो विक्रीस पाठविणेही शेतकऱ्यांना परवडत नाही. बाजार शुल्क आकारणी (पट्टी), वाहतूक खर्च मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. – विलास भुजबळ, ज्येष्ठ अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

हेही वाचा : पुणे : कारवाईची भीती दाखवून महिलेची १३ लाखांची फसवणूक

‘टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय नाही’

लागवड केलेल्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. घाऊक बाजारात ४ ते ५ रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय उरला नाही. टोमॅटोची तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नाही. एका प्लास्टिकच्या जाळीत (क्रेट) २२ किलो टोमॅटो बसतात. घाऊक बाजारात एका प्लास्टिक जाळीला ७० ते ८० रुपये दर मिळत आहेत. टोमॅटोला दर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. – अजित तांबे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, वरुडे, ता. शिरुर, जि. पुणे

टोमॅटोचे दर

मार्केट यार्ड घाऊक बाजार (१० किलो) ४० ते ५० रुपये
किरकोळ बाजार (एक किलो) १५ ते २० रुपये

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune tomato prices fall to rupees 5 per kg farmers worried pune print news rbk 25 css