पुणे : महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हे तिघे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर रास्ता पेठ येथील हाॅटेल शांताईसमोर महाविकास आघाडीची सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. या सभेच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके सभेला मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार गुरुवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा : पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…

पुणे आणि शिरूर लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी तर बारामतीसाठी ७ मे ला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून प्रचार सुरू झाला आहे. वैयक्तिक भेटीगाठी, नागरिकांबरोबर संवाद, पदयात्रांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता नेत्यांच्या सभांमुळे वातावरण तापणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडण्यास सुरुवात होणार आहे. शरद पवार, संजय राऊत या सभेच्या निमित्ताने काय बोलणार, याबाबतही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सभा घेण्याचे नियोजनही महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचे काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा : गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान

मोहोळ यांचा अर्ज मंगळवारी

महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज पुढील आठवड्यात मंगळवारी (२३ एप्रिल) दाखल करण्यात येणार आहे. मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची सभाही आयोजित करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरू झाले आहेत.

हेही वाचा : पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

धंगेकर, मोहोळ यांच्या प्रचाराला वेग

महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. धंगेकर यांनी मंगळवारी डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आणि शहीद मेजर ताथवडे उद्यानात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. काही ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिकांबरोबर धंगेकर यांनी चर्चा केली. दरम्यान, मोहोळ यांनी मंगळवारी येरवडा भागातील गाडीतळ चित्र चौकात पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला. पदयात्रेचा समारोप लक्ष्मीनगर पोलीस चौक परिसरात झाला. उपनगरातील प्रचारावर मोहोळ यांनी भर दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनीही कोथरूड मतदारसंघात प्रचार केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune tomorrow supriya sule amol kolhe ravindra dhangekar to file lok sabha nomination pune print news apk 13 css