पुणे : ट्रॅक्टर उलटून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत तडजोडीत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना दाखल केलेला दावा निकाली काढण्यात आला.
याबाबत सावित्री सुनील पाटील यांनी गेल्या वर्षी १९ मे रोजी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात २० लाख ६५ हजारांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दावा दाखल केला होता. १९ मे रोजी दुपारी शेतातील कांदा पावसापासून सुरक्षित राहावा म्हणून शेतकरी सुनील पाटील हे शेतातील कांदा हलविण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाले होते. त्या वेळी ट्रॅक्टर खड्ड्यात उलटला. अपघातात सुनील पाटील यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांनी वाहनचा वैयक्तिक विमा उतरविला आला होता. पतीचा ट्रॅक्टर उलटून अपघाती मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीने नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचे वकील ॲड. राहुल अलुरकर यांच्या मार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगात दावा दाखल केला होता.
संबंधित दावा प्रलंबित होता. पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे, सरिता पाटील यांनी दावा सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. लोक अदालतीत हे प्रकरण ॲड. किरण घाेणे, ॲड. अनिल सातपुते यांच्या पॅनेलसमोर तडजोडीसाठी ठेवण्यात आले. विमा कंपनीकडून ॲड. ऋषीकेश गानू, ॲड. आकाश फिरंगे यांनी बाजू मांडली. विमा कंपनीच्या अधिकारी भक्ती कुलकर्णी यांनी दावा तडजोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले. तडजोडीत शेतकऱ्याच्या पत्नीला २० लाख रुपये देण्यात आले. कार्यालयीन कर्मचारी रघतवान, योगेश चवंडके, मनीषा पाटील, चित्रा आपटे, ऋता चाबुकरस्वार,परीक्षित धुमाळे, गजानन चव्हाण यांनी सहाय केले.