पुणे : गणेश खिंड रस्त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्यावर मेट्रो आणि उड्डाणपूल एकमेकांशी संलग्न असणार आहेत. या पुलाच्या उभारणीचे काम आता वेगाने सुरू झाले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयापासून हा उड्डाणपूल सुरू होईल. तो विद्यापीठ चौकातून पुढे औंध, बाणेर, पाषाण अशा तीन बाजूंना उतरेल. या पुलाची लांबी दोन्ही बाजूंनी १.७ किलोमीटर असून, रुंदी २३ मीटर आहे. पुलाच्या एकूण ३२ पैकी २७ खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता उड्डाणपूल खांबावर पिअर आर्म बसविण्यास सुरुवात झाली आहे. पहिला पिअर आर्म ई-स्क्वेअर चित्रपटगृहासमोरील भागात बसविण्यात आला. हे पिअर आर्म वाघोली येथे तयार करण्यात येत आहेत. हा उड्डाणपूल पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : मध्य प्रदेशातून पुण्यात येऊन घरफोडी करणारी टोळी अखेर गजाआड

महामेट्रोने नळस्टॉप चौकात उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाप्रमाणेच या पुलाची रचना असणार आहे. मेट्रोच्या खांबांशी तो संलग्न असेल. या उड्डाणपुलाच्या २८८ पाईलची उभारणी पूर्ण झाली असून, २८ पाईल कॅप बसविण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या प्रकल्प आढावा बैठकीत या उड्डाणपुलाच्या कामाचे १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कामाने आता वेग घेतला आहे. उड्डाणपुलाच्या शिवाजीनगर बाजूकडील रॅम्पचे बांधकाम करताना पुरेसा सेवा रस्ता उपलब्ध राहावा यासाठी गणेश खिंड रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ३२ पैकी २७ खांब उभारण्यात आले असून, पिअर आर्म बसविण्यास सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.”, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी म्हटले आहे.

Story img Loader