पुणे : बागेश्वर महाराज यांच्या संत्सग कार्यक्रमाचे आयोजन सोमवारपासून (२० नोव्हेंबर) संगमवाडीतील निकम फार्म येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त संगमवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत २२ नोव्हेंबरपर्यंत बदल करण्यात आले असून, या भागातील प्रवासी वाहतूक करणारा खासगी बस थांबा खराडी येथे तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडहून संगमवाडीतील थांब्यावर येणाऱ्या खासगी बस खडकी, होळकर पूल, येरवडामार्गे खराडी जकात नाका येथे जातील. नगर रस्त्यावरुन पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या खासगी बस नगर रस्ता,येरवडा, होळकर पूल, खडकीमार्गे इच्छितस्थळी जातील. गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या खासगी बस शिवाजीनगर, वेधशाळा चौक, संगम पूल, बंडगार्डन रस्ता, डाॅ. आंबेडकर सेतू यामार्गे नगर रस्त्याकडे जातील.
हेही वाचा : पुणे : मनोज जरांगे पाटील यांची उद्या खराडीत सभा, वाहतूक व्यवस्थेत बदल
नगर रस्त्यावरुन संगमवाडी बस थांब्यावर येणाऱ्या बससाठी प्रवेश बंद राहणार आहे. खासगी बसचालकांनी वाटेत प्रवाशांच्या सोयीनुसार उतरण्यास सांगावे. खासगी बस संगमवाडीकडे न आणता अन्य ठिकाणी लावाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
हेही वाचा : पुणे : मंगळवार पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला अटक
गर्दी विचारात घेऊन वाहतूक बंद
जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून संगमवाडी पूलमार्गे येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घ्यावी. संगमवाडीत होणारी गर्दी विचारात घेऊन आवश्यकत भासल्यास पाटील इस्टेट ते येरवड्यातील सादलबाबा चौक रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन वाहतूक पोलीस आयुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.