पुणे : मोहरमच्या काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी दुपारनंतर बदल करण्यात येणार आहेत.
मध्यभागातील मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृह परिसरातून करण्यात येणार आहे. मध्यभागासह लष्कर, खडकी, मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मोहरमनिमित्त ताबूत, पंजे, छबिले यांची मिरवणूक काढण्यात येते. मध्यभागातील मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ बुधवारी (१७ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृह परिसरातून होणार आहे. श्री दत्त मंदिर चौक, बेलबाग चौक, हुतात्मा चौक (बुधवार चौक), शनिवारवाडा, फुटका बुरूज, गाडगीळ पुतळा चौक, डेंगळे पूल, जुना बाजार, शाहीर अमर शेख चौकमार्गे मिरवणूक जाणार आहे. संगम पूल येथे मिरवणूक विसर्जित करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. रानडे यांना अस्थिर करण्याचे प्रयत्न

लष्कर भागातील मिरवणुकीचा प्रारंभ बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ताबूत स्ट्रीट येथून होणार आहे. बाटलीवाला बगीचा, सरबतवाला चौक, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, गायकसाब मशीद, महात्मा गांधी रस्ता, कोहिनूर चौक, भगवान महावीर चौक, बुटी स्ट्रीटमार्गे मिरवणूक पुन्हा बाटलीवाला बगीचा येथे येणार आहे. त्यानंतर लष्कर भागातील ताबूत नेहरू मेमोरिअल हाॅल, रास्ता पेठ, दारूवाला पूल, फडके हौद चौक, मोती चौक, सोन्या मारूती चौक, बेलबाग चौकमार्गे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. खडकी भागातील मिरवणुकीचा प्रारंभ सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास होणार आहे. खडकी भागातील मिरवणूक बोपोडीमार्गे जाणार असून, दापोडीतील नदीकिनारी विसर्जित होणार आहे. मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून दुपारी चारच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे. संगम पूल येथे मिरवणूक विसर्जित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : देशभरात कडधान्ये, तेलबियांच्या पेरणीत वाढ

लष्कर भागातील इमामवाडा येथून सकाळी पावणेदहाच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे. इमामवाडा, नेहरू मेमोरिअल हाॅल, पोलीस आयुक्त कार्यालय, साधू वासवानी चौक, कॅनोट रस्तामार्गे इमामवाडा येथे मिरवणूक विसर्जित होणार आहे.