पुणे : तूरडाळीच्या दरात आठवडाभरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १८० ते १८५ रुपयांवर गेले आहेत. अपुऱ्या पुरवठ्यामुळे मागील वर्षभरापासून तूरडाळीचे दर चढेच आहेत. अपुरा पाऊस, काढणीला झालेला अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आठवडाभरात तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो सरासरी पाच रुपयांनी वाढ होऊन तूरडाळ १८० ते १८५ रुपये किलोंवर गेली आहे. चणाडाळीच्या दरात सरासरी चार रुपयांची वाढ झाली असून ती ८५ ते ९० रुपये किलोंवर आहे. मूगडाळीचे दर १३० ते १५० रुपये किलो, तर उडीदडाळीचे दर १४० ते १५० रुपयांवर गेले आहेत.

हेही वाचा : लेखक अभ्यासक प्रा. आनंद रंगनाथन का म्हणाले, ‘घटनेत बदल आवश्यकच…’

अपुरा पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनात घट झाली आहे. तुरीचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीचे दर तेजीत आहेत. सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असतानाही तुरीची खरेदी सरासरी नऊ ते १० हजार रुपयांनी सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तुरीपासून डाळ तयार करताना कमी उतारा मिळत आहे.

तुरीचे दर बारा हजार क्विंटलवर

बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर बारा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी – मार्च महिन्यात १० हजार रुपयांवर असलेल्या तुरीच्या दरात एप्रिलमध्ये दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. कृषी पणन मंडळाच्या माहितीनुसार, शनिवारी अमरावती बाजार समितीत लाल तुरीला सरासरी ११,८००, जालना (पांढरी) ११,३७६, अकोला १२,०७५, नागपूर ११,८४२, छ. संभाजीनगर १०,८०० आणि परतूरमध्ये ११,१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी

अपुरा पाऊस आणि काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे तुरीचा दर्जा घसरला आहे. तुरीपासून तूरडाळ करताना उतारा कमी मिळत आहे. त्यामुळे तूरडाळीचे दर चढे आहेत. जून-जुलैमध्ये डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

नितीन नहार, डाळींचे व्यापारी, पुणे बाजार समिती
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune tur dal prices increased to 180 to 185 rupees per kg pune print news dbj 20 css