पुणे : पुणे शहरातील कात्रज, पाषाण, पेशवे तसेच मॉडेल कॉलनी येथील तलावांचे सुशोभीकरण केले जाणार असून यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही कामे केली जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदांना मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरातील जलपर्णी काढण्यासाठी खर्च केला जातो. तसेच, तलावांच्या स्वच्छतेसाठीदेखील खर्च होतो. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महापालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी तलावांच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेला मिळाला होता. त्यामधून शहरातील चार तलावांच्या सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने याच्या निविदा काढल्या होत्या.

पाषाण तलावासाठी ४१ लाख ८८ हजार रुपये, कात्रज तलावासाठी ४१ लाख ८८ हजार रुपये आणि मॉडेल कॉलनी तलावासाठी ४९ लाख ४२ हजार लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच, पेशवे तलावासाठी ४९ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याला मान्यता देण्याचे प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले होते. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पात तलावाच्या परिसरात झाडे लावणे, काँक्रीटचे रस्ते तयार करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि तलावाभोवती जॉगिंग ट्रॅक बांधणे असे प्रस्तावित आहे. तलावांजवळ कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

ड्रेनेजमुळे पाणी दूषित होत असल्याने, तलाव स्वच्छ करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. २०१७ मध्ये, महापालिकेने कात्रज तलावात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या पाण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा तयार केली. शिवाय, महापालिकेकडून सध्या दररोज दोन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधला जात आहे. पुणे शहर राहण्यासाठी सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असताना या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे, असे या प्रस्तावांमध्ये म्हटले आहे.

ही कामे होणार..

  • तलावालगत असलेल्या उद्यानामध्ये लाकडाची बाके बसविणार
  • पाण्याचे कारंजे उभारणार
  • भिंतींचे रंगकाम केले जाणार
  • पदपथ तयार केले जाणार
  • तलावाला सीमाभिंत बांधणार
  • तलावात कचरा टाकण्यास बंदी

Story img Loader