पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या २११ वर पोहोचली आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात ३७ वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. तो सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी होता. त्याला १० जानेवारीला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या हातांमध्ये अशक्तपणा होता. त्याला आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात आली होती. त्याच्या तपासणीत जीबीएसचे निदान झाले होते. प्रकृती बिघडल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याचा १७ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुण्यातील खासगी रुग्णालयात २६ वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. ती नांदेड सिटीमधील रहिवासी होती. तिला १५ जानेवारीला जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर तिला गिळण्यास त्रास सुरू होऊन अशक्तपणा जाणवू लागला. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिचा १८ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जीबीएसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात जीबीएसचे आतापर्यंत २११ रुग्ण आढळून आले असून, त्यातील १८३ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, पुणे महापालिका ४२, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९४, पिंपरी-चिंचवड महापालिका ३२, पुणे ग्रामीण ३३ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत १० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ३६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १४४ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

जीबीएसचा उद्रेक

एकूण रुग्णसंख्या – २११

रुग्णालयात दाखल – ५६

अतिदक्षता विभागात – ३६

व्हेंटिलेटरवर – १६

बरे झालेले रुग्ण – १४४

मृत्यू – ११

Story img Loader