पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून महिलेसह दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना जनता वसाहतीत घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी तिघांना अटक केली.
मिलिंद सुधीर कवडे (वय १९), शुभम नारायण मोरे (वय १९), संकेत श्रीकांत घाणेकर (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ऋषीकेश उर्फ चेतन शरद पवार (वय २३, रा. वाघजाई मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत, पर्वती) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
जनता वसाहतीत नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी रात्री महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते खुर्च्या काढत होते. त्या वेळी आरोपी दुचाकीवरून आले. आरोपी कवडे, मोरे, घाणेकर आणि अल्पवयीन साथीदारांना वाट मोकळी करून देण्यात आली. आरोपींनी पवार आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींना समजावून सांगण्यात आले. त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. काही वेळानंतर आरोपी दुचाकीवरून पुन्हा तेथे आले. त्यांच्याकडे कोयता आणि तलवार होती. आरोपींनी पवार याच्यावर तलवारीने वार केला.
पवारने हाताने वार अडवल्याने त्याला दुखापत झाली. त्यानंतर परिसरातील रहिवासी संगिता अवताडे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून आरोपी पसार झाले. तिघांना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास करत आहेत.