पुणे : जिल्ह्यातील विविध भागातील दुचाकी मौजमजेसाठी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ३ लाख ६० हजारांच्या १२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सूर्यकांत बळीराम आडे (वय २५ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
हेही वाचा : पुण्यात रात्री गस्तीसाठी विशेष गाड्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी मधुकर आमले यांची दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपी सराईत असल्याची माहिती पोलीस हवालदार केंगले यांना मिळाली. आरोपी सूर्यकांत हा पिंपळे सौदागर येथे राहत होता. दरम्यान, वाकड परिसरात आरोपी हा पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर असल्याची माहिती बातमीदारामार्फत हिंजवडी पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ तिथं जाऊन त्याला अटक करण्यात आली. आरोपी सूर्यकांत याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, हडपसर, चिखली, तळेगाव, हिंजवडी, वाकड परिसरात मौजमजेसाठी दुचाकी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीकडून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.