लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आले. बालेवाडीतील एका खासगी कंपनीत काम करणारे आठ ते दहा तरुण बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पवना धरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी चारच्या सुमारास सर्वजण पवना धरणाच्या पाणलोटात पाेहण्यासाठी उतरले. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले.
हेही वाचा : चिंचवड स्थानक येथील उड्डाणपूल लवकरच जमीनदोस्त; वाचा नवीन पूल कधी उभारणार
त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस, तसेच शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवक तेथे दाखल झाले. धरणात बुडालेल्या एकाचा मृतदेह शोघण्यात यश आले. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.