सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता संगणकाच्या साहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी पद्धती (डिजिटल इव्हॅल्युएशन सिस्टिम) वापरली जाणार आहे. त्यासाठीची प्रणाली विद्यापीठाने विकसित केली असून, प्रायोगिक तत्त्वावर पदव्युत्तर स्तरापासून अंमलबजावणी करून पुढील टप्प्यात पदवीस्तर आणि संलग्न महाविद्यालयांसाठीही ही पद्धत वापरण्याचे नियोजन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे एक हजार महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यामुळे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाते. सध्या उत्तरपत्रिकांची तपासणी केंद्रीय (कॅप) स्तरावर प्राध्यापकांकडून करण्यात येते. मात्र या प्रक्रियेत काहीवेळा त्रुटी राहतात, निकाल जाहीर होण्यास विलंब होतो. आता विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातील काही मोजक्या विद्यापीठांमध्ये ही पद्धती वापरली जात आहे. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑक्टोबरपासून या पद्धतीची अंमलबजावणी विद्यापीठ संकुलातील सर्व शैक्षणिक विभागांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांपासून करण्याचे नियोजन आहे.

विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, की डिजिटल इव्हॅल्युएशन सिस्टिममध्ये उत्तरपत्रिका स्कॅन करून त्याचे रूपांतर पीडीएफमध्ये केले जाईल. त्यानंतर ती पीडीएफ उत्तरपत्रिका प्रणालीमध्ये जाईल. प्रणालीमध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, आदर्श उत्तरपत्रिका, गुणदान पद्धत, परीक्षकांचे विषय निश्चित केलेले असतील. त्यामुळे परीक्षकांना त्यांच्या विषयाच्या उत्तरपत्रिका त्यांच्या लॉगीनमध्ये दिल्या जातील. प्रश्नांचे स्वरूप आणि गुण या प्रमाणे प्रणालीमध्ये पर्याय उपलब्ध असतील. परीक्षकांना उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यानी लिहिलेले उत्तर वाचून गुण देऊ शकतात. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न तपासला जाईल. एखादा प्रश्न तपासायचा राहिला असल्यास, गुणदान केले नसल्यास उत्तरपत्रिकेची तपासणी पूर्ण होणार नाही. विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेनुसार परीक्षकांना शेरा देता येईल अशी सुविधा आहे.

प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा झाल्यावर निकाल जाहीर करण्यास सरासरी चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात. मात्र संगणक प्रणालीशी परीक्षक आणि परीक्षा विभागातील कर्मचारी योग्य पद्धतीने समरस झाल्यास दहा दिवसांतही निकाल जाहीर करणे शक्य आहे. या पद्धतीने निकालातील त्रुटी शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. – डॉ. संजीव सोनावणे, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune university computer paper checking system will start from october on trial basis pune print news asj