पुणे : पुण्यात या वेळी गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा ३.७ टक्के अधिक मतदान झाले असून, सहाही विधानसभा मतदारसंघांत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. हा परिणाम नेमका कोणत्या लाटेचा आहे, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. कसबा, पुणे कँटोन्मेंट, कोथरूड आणि पर्वती या प्रमुख विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ‘कसबा’ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ समजला जात होता. मात्र, वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी तो काँग्रेसकडे खेचून आणला. या निवडणुकीत कसबा मतदारसंघातून तब्बल ५९.२४ टक्के मतदान झाले आहे. या परिस्थितीत भाजपला गेल्या निवडणुकीसारखी आघाडी मिळणार, की धंगेकरांनी पोटनिवडणुकीत दाखवलेला चमत्कार पुन्हा दिसणार, अशी चर्चा आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतटक्काही वाढला आहे. या मतदारसंघात ५२.४७ टक्के मतदान झाले आहे. कसब्याप्रमाणेच कोथरूड विधानसभा मतदारसंघही भाजपचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भाजपबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळेही या मतदारसंघात असून महायुतीला पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही या भागात ताकद असल्याचे यापूर्वीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या वाढत्या मतदानाचा लाभ महायुतीला होईल, अशी चर्चाही होत आहे. मात्र कोथरूडमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही ताकद असून या पक्षाने एकदिलाने धंगेकर यांचे काम केल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला किती मताधिक्य मिळणार, याची उत्कंठाही निर्माण झाली आहे.
हेही वाचा : निवडणुकीत होऊ दे खर्च… कोणाचा खर्च सर्वाधिक, कोणाचा हात आखडता?
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५३.१३ टक्के मतदान झाले आहे. वाढलेले मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरणार असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. पर्वतीमध्ये ५५.४७ टक्के मतदान झाले असून, या मतदारसंघात भाजपची आघाडी राहणार, अशी चर्चा असली, तरी काही समीकरणे काँग्रेसच्या बाजूने झुकणारी असल्याचेही बोलले जाते. शिवाजीनगरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ५०.६७ टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून काँग्रेसने तुल्यबळ लढत दिली होती. या लढतीमध्ये काँग्रेसचा निसटता पराभव झाला होता. ही बाब लक्षात घेता शिवाजीनगर मतदारसंघ कोणाला साथ देणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ५१.७१ टक्के मतदान झाले असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांची ताकद आहे.
विधानसभानिहाय मतदान
मतदारसंघ -२०१९ मधील मतदान -२०१४ मधील मतदान
वडगावशेरी -४६.४१ -५१.७१
शिवाजीनगर -४६.९४ -५०.६७
कोथरूड -५०.२६ -५२.४३
पर्वती -५२.०७ -५५.४७
पुणे कँटोन्मेंट -४८.७९ -५३.१३
कसबा पेठ -४९.३४ -५९.५४
हेही वाचा : महागलेल्या लिंबांच्या दरात अचानक घसरण का झाली?
भाजप आमदारांच्या मतदारसंघांत जास्त मतदान
कोथरूड, पुणे कँटोन्मेंट, पर्वती, शिवाजीनगर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघही भाजपकडे होता. मात्र, मुक्ता टिळक यांच्या निधानामुळे वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तो भाजपकडून खेचून घेतला. वडगावशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, जे सध्या महायुतीत आहेत. मात्र, या ठिकाणी वाढलेले मतदान नेमके कोणाला फायदेशीर, याबाबत उत्सुकता आहे.